बळी पिकवतो मोती
माती उसवती फाळ
निघे ढेकळं ही कार
वाहे अंगातून घाम
अंगा उन्हाचा रे मार
मागे कुळव फिरतो
गेली ढेकळाची धार
डोई उन्हाचे थैमान
पायी वेदनांचा वार
गाडी जुंपली खताला
सारं वावर झाकलं
जीव जगाची काळजी
जीनं कष्टाला वाहिलं
आता ओढ पावसाची
मेघ दाटले अंबरी
कोसळला मेघ राजा
पिकं येईल नंबरी
झाला वाफसा शेतात
मोती पेरीते तिफण
माती लोटी अंगावर
मागे चालती रासण
कोंब निघाले हिरवे
पिकं रानात डोलती
रास खळ्यात धान्याची
बळी पिकवितो मोती
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा