बुधवार, १७ मार्च, २०२१

पहाट (कविता)

       पहाट


फुटे तांबडे तांबडे

झाली पहाट पहाट

सुरू पक्षांचा कालवा

वाजे रहाट रहाट


गुरे ढोरे लगबग

बाग कोंबडा घालतो

दारी सडा सारवण

वारा मधाळ वाहतो


धूर कोपटात निघे

चुली पेटल्या पेटल्या

झाली सुरूच वर्दळ 

बाया कामाला लागल्या


धारा दुधाच्या पिळतो

सड हातात धरुनी

दादा शेतकरी माझा

जातो दुधात रमूनी


सुरू धावपळ जीव

धावे शेतात माऊली

राब राबतो शेतात

देतो कुटुंबा सावली


रवी क्षितिजा दिसता

दाटे सोनेरी प्रकाश

दूर लोटला अंधार

झाले मोकळे आकाश


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

    9405237081






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...