अनवाणी
होतो लहान मी जेव्हा
पायी चप्पल न भेटे
स्पर्श मातीचा पायास
खुणा मातीत उमटे
तप्त फुफुटा पायास
जाळ वेदनांचा होई
काटा पायात रुतता
कळ मस्तकात जाई
पडे चिखल्या पायात
होई ठसठस पायी
टाच उलता भयाण
रक्त भळाभळा वाही
पाय फिरे अनवाणी
सारी वेदनांची गाणी
आठवता ते दिवस
येते नयनी रे पाणी
झाला एकच फायदा
रक्त गतीत वाहिले
वार वेदना झेलण्या
रट्ट कातडे जाहले
झाले निडर भक्कम
पाय रे चप्पल विना
देवा ठेव कृपा दृष्टी
अशी वेळ नको कोणा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा